Alexa नावाची पंचवीस वर्षांची ही मेड पाहयला गेल तर वेल एज्युकेटेड मुलगी परंतु; काही कारणाने नवर्याशी तीच भांडण झाल्याने तिने आपल्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन घर सोडण्याचा निर्णय घेतला. घर सोडतेवेळी तिच्याकडे फक्त अठरा डाॅलर होते. ती मध्यराञी मुलीसह स्वतच्या कारमध्ये घराबाहेर पडते. अॅलेक्सा ज्या पध्दतीने, ज्या वेगाने आणि तितक्याच शांतपणे कार चालवताना दिसते…तिचा तो कार चालवतानाचा आत्मविश्वास मला भारी आवडला. शेवटी अमेरीकन मुलगीच ती….तिथे या गोष्टी नाॅर्मल आहेत.
गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी तिच्याकडे पुरते पैसे नव्हते. तिथून तिचा प्रवास सुरू होतो. प्रत्येक डाॅलर खर्च करताना तिचा जीव तूटत असतो आणि मेंदूतील ताण वाढत असतो. शेवटी तीला एक नोकरी मिळते; त्यामध्ये टाॅयलेट आणि घर सफाई करण्याच काम तिला मिळत.
नोकरीवर जायच तर तिला तिची तीन वर्षांची मुलगी ‘मॅडी’ हिला ठेवण्यासाठी ‘डे केअर’ ची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी काही डाॅलर वेगळे ठेवावे लागतात.
ती एका डी.व्ही.शेल्टर मध्ये(domestic violence shelter) राहू लागते. आता भारतात कोणी स्ञी नवर्याशी अस भांडून घराबाहेर पडली तर तिच्यासाठी अशी डी.व्ही.शेल्टर नाहीत हे काही वेगळ सांगायला नकोय. अशा शेल्टरमध्ये काही मुली थोडे दिवस राहयच्या, काहीजणी रूसवा संपला की पून्हा नवर्याकडे जायच्या, पुन्हा वाद झाला की पून्हा शेल्टरच दार ठोठवायच्या. तर काहीजणी कायमचा निरोप घेऊन नवीन आयुष्य सुरु करायच्या.
मॅडीला डे केअर ला ठेवल्यानंतर अॅलेक्सा एका हातात वॅक्युम क्लीनर, दुसर्या हातात वेगवेगळ्या लिक्वीडच्या बाॅटल्स, स्पंज, हॅंन्डग्लोझ आणि बरचस क्लीनींग करण्यासाठीच मटेरीअल असलेली बास्केट घेऊन घरोघरी “मेड” च्या भूमीकेत फिरू लागली. वेगवेगळ्या घरी गेल्यामुळे तिला अनेक लोकांच्या घरातील परिस्थिती समजू लागली. विशेषत: “प्रेम” ही भावना किती महत्त्वाची आहे; किती छान आहे याची जाणीव झाली.
या सिरीझमध्ये बरेच छान असे सुंदर मुद्दे मांडले आहेत. त्यातीलच एक “लव्हींग हाऊस” हा मला आवडलेला भाग. अॅलेक्सा ज्या अनेक घरांमध्ये कामासाठी जात होती त्या घरांपैंकी काही घरांची उदाहरणे इथे देतेय. ज्या घरांना अॅलेक्सने तिच्या भाषेत नावे दिली आहेत.
पहिलं घर जिथे अगदी हाॅलमधील फर्निचरपासून ते किचनमधील भांड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट अॅंटिक, काॅस्टली, तितकीच रेखीव आणि युनिक ज्यासाठी हजारो डाॅलर मोजले गेले होते; परंतु घरातील व्यक्तींना त्या वस्तू वापरायला की आठ हजार डाॅलर मोजलेल्या खूर्चीवरती बसायलाही वेळ नव्हता….अशा या लक्झरियस घराची मालकीण रजीना. ही अॅलेक्साची पहिली क्लायंट होती. जितकी श्रीमंत तितकीच ती कंजूस दाखवली आहे. माञ पुढे जाऊन हीच रजिना अॅलेक्साची खूप मदत करते जणू तिला अॅॅलेक्साकडून पैशापेक्षाही माणुसकी महत्त्वाची याची जाणिव झाली असावी. व्यक्तीगत रजिना कशीही असली तरी तिचा प्रवासही कठिण होता. घरात आपला आदर केला जावा म्हणून तिने तिच्या करिअरला महत्त्व दिल. खूप कष्ट केले, खूप पैसा कमवला. परंतु आई बनू शकली नाही. सातवेळा आय.व्ही.एफ सारखी क्लेषकारक आणि महागडी ट्रीटमेन्ट घेऊनही ती आई होऊ शकली नाही….. ही स्ञी आपल्याला मूल देवू शकत नाही म्हणून तिचा नवरा तिला सोडून गेला. शेवटचा पर्याय तिने सरोगसी अवलंबला आणि ती एका मुलाची आई झाली. म्हणजे शेवटी काय तर “मातृत्व” हे स्ञी साठी आणि समाजासाठी किती गरजेच असतं. इथे स्ञीपेक्षाही ती एक आई झाली तरच तिला समाजात किंमत आहे; हे कटू सत्य दाखवलय.
दुसर्या घरात अशीच श्रीमंती….घरात दोघेच नवरा-बायको पण दोघांच्याही बेडरूम वेगवेगळ्या. नवर्याच्या रूममध्ये पाॅर्न मॅगझीन्स तर बायकोच्या रूममध्ये परपुरूषांची लव्हलेटर्स. म्हणजे थोडक्यात दोघेही राहयला एकाच घरात माञ ते जगत असलेली विश्व वेगळी. अॅलेक्साला समजत नव्हतं की दोघे तर स्वछंद आहेत मग अशी कोणती गोष्ट होती ज्याने या दोघांना आत्तापर्यंत एकञ बांधून ठेवल होत?? कदाचित “आदर”. ते दोघे एकमेकांचा आदर करत होते; पण त्यांच्यात प्रेम नव्हतं.
तिसरं घर जे “मेड” ला म्हणजेच अॅलेक्साला आणि मलाही आवडलेल सुंदर घर. ज्या घराला अॅलेक्साने “लव्हिंग हाऊस” हे नाव दिल होत……!!
त्या घरात राहत असलेला इसम मध्यमवयीन साधारण: चाळीस-पंचेचाळीस वर्षे. त्याची बायको अंथरूणाला खिळलेली. माहित नाही किती वर्षांपासून ती अशी अंथरुणावर पडून होती. त्यांचा एक मुलगाही दाखवला आहे. तो दहा-बारा वर्षांचा असावा. वडील आणि मुलगा घरात कायम त्या अंथरूणावर पडून असलेल्या स्ञीची काळजी घेताना दिसायचे. तो नवरा स्वत बायकोला जेवण भरवायचा. बाथरूममध्ये उचलून घेऊन जायचा. मुलगा किचनमधील शक्य तेवढ आवरताना, मधूनच आईसाठी चहा, काॅफी बनवताना दाखवला आहे. हाच मुलगा आईच्या बेडशेजारी बसून तिच्याशी खूप सार्या गप्पा मारतानाही दिसतोय. वडील आणि मुलगा अॅलेक्सालाही खूप आदर द्यायचे. त्या घरात गेल्यावर अॅलेक्साला शांत, फ्रेश, पाॅझिटीव्ह वाटायच. तिथे केलेल्या कामाने तिला थकवा यायचा नाही. अंथरूणावर पडलेल्या स्ञीवीषयी तिच्या नवर्याच आणि मुलाच असणार निखळ प्रेम तिला विचार करायला लावयचं…त्या घरातील वडील-आई-मुलगा यांच्यातील ह्यद्यस्पर्शी प्रेमामुळेच तिने या घराला “लव्हिंग हाऊस” नाव दिल होत…!!
“Loving house” हे तिच्यासाठी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच कारण बनल होत. आपण घर सोडून चूक केली का? आपल्यात आणि आपल्या नवर्यामधील नात्यात काय कमी पडलं? मी, माझी मुलगी आणि नवरा एकञ असतो तर किती बरं झाल असत.
आपण घर सोडल कशासाठी तर नवरा आपल्यावर ओरडत असतो, वारंवार तो आपल्यासाठी काय आणि कसे पैसे खर्च करतो, घर कसं चालवतो? हे बोलून दाखवत असतो म्हणून???? मग हा domestic violence होतो का? की फक्त हात ऊचलल्यावर, मारल्यावरच तो असतो? नवरा आपल्यावर आणि मुलीवर प्रेम तर करतो पण ड्रींक करतो, ड्रग्झ घेतो, स्वतचा ताबा सोडतो,,,गलिच्छ भाषा वापरतो. त्याच हे रूप पाहून मॅडी घाबरते; तिच्या मनावर खोलवर परिणाम होतो.
अॅलेक्सालाच समजत नव्हतं की फक्त मारल्यावरच अन्याय केला अस म्हणायच का? बोलण्याने, ओरडण्याने जे मनाला लागत, जो मानसिक ञास होतो त्याला अन्याय म्हणायच नाही का? शारिरीक ञास हाच domestic voilence असतो का भावनिक, मानसिक ञास हाही domestic violence च होतो ना?? किती सहज म्हणतात लोक की एका कानाने ऐकायच आणि दुसर्या कानाने सोडून द्यायच…हे अस शक्य असत का? आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला आदर द्यायचा नाही मग हे कसलं प्रेम??? अॅलेक्सा आपल्या मुलीचा चहरा आठवायची आणि तिला तिच्या प्रश्नांची ऊत्तरे मिळायची. मॅडी कडे पाहिल की तिला प्रेम आणि आदर दोन्हीही दिसायच…!
प्रेम आणि आदर यामध्ये हलकीशी धुसर रेषा असते एकदा का ती समजली की बर्याच गोष्टी स्पष्ट होत जातात. “लव्हिंग हाऊस” मध्ये एकमेकांविषयी फक्त प्रेम नाही तर ते एकमेकांचा मनापासून आदर करतात. सगळच किती गुंतागूंतीच…..विचार केला तर खूप सोप्पं आणि नाही केला तर सगळचं निरर्थक….!!
अॅलेक्सा ही एक क्रिएटिव्ह रायटर देखील होती……पुढे जाऊन तिने क्लीनींगच काम सोडून दिल….तिला एका मोठ्या युनिर्व्हसिटीत स्काॅलरशीपसह अॅडमीशन मिळाल….राहयला घर मिळाल. ती एक चांगल आयुष्य जगू लागली. तिने केलेल्या कष्टामुळे तिच्या मुलीच भवितव्य सुरक्षित झालं…..एका आईला आणखी काय हवं असतं…..माञ तिच्या आयुष्यातील “Loving house” त्या दोघींपुरतच मर्यादीत राहिल……कधी-कधी अपूर्ण फॅमिलीदेखील पुर्णत्वाच आयुष्य आनंदाने जगू शकते…..याचच ऊदाहरण म्हणजे “मेड”…!!!!
आणखी एक पाञ मी विसरलेच अॅलेक्सची आई पाॅला. हे पाञ काही वेगळच आहे. स्वतच्याच दुनियेत मग्न असलेली ही पाॅला. कलेवरती तिच नितांत प्रेम. ती एक चांगली आर्टिस्ट आहे; परंतु नवर्याच्या अहंकारामुळे तिची कला कधी जगासमोर येऊच शकली नाही. कधीकाळी तिही घरगुती हिंसाचाराची बळी ठरली आहे. पण तिने ते कधी मान्यच केल नाही. समाजात काही स्ञिया अशादेखील असतात; ज्या आपणावर अन्याय होतोय, कोणीतरी आपल्याला डाॅमिनेट करतोय हे मान्यच करत नाहीत…त्यापैंकीच एक पाॅॅला. तिला भावनिकदृष्या नेहमीच एका पुरूषाची गरज पडत राहिली….आणि ते पुरूष तिला फसवत राहीले. इमोशनली कोणावर इतक अवलंबून असू नये ज्यामुळे आपलं अस्तित्वचं संपून जाईल. आपला स्वाभिमान गळून पडेल…..!!
ही वेबसिरीज मी Netflix वरती पाहिली…..वेबसिरीज हिंदीमध्ये आहे. प्रत्येक पाञाने खूप सुंदर अभिनय केला आहे. मॅडी अॅलेक्साची मुलगी…..तीनच वर्षांची असूनही खूपच समंजस दिसतेय….तिचे हावभाव आणि डोळ्यातील चमक यात एका आईवरचा प्रचंड विश्वास दिसतोय. अॅलेक्साची भूमिका आपणाला कमाल आत्मविश्वास देऊन जाते.
वेब सिरीज म्हटलं की माझ्या मनात पहिल्यांदा येणारी भावना म्हणजे ‘वेस्ट ऑफ टाईम’ ‘वेस्ट ऑफ मनी’ अशी होती. कारण तिथे बहुदा violence,abuse content, drug addiction अशा गोष्टी दाखवल्या जातात. परंतु प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीला अपवाद हे असतातच त्यापैकीच “मेड(MAID)” ही वेब सिरीज. वेब सिरीज एकदम आत्मविश्वास देणारी आणि समाजाचे बरेच पैलू दाखवणारी आहे. ही वेबसिरीज थोडीशी स्ञीवादी आहे. स्ञीयांवर होणारे अन्याय, छळ, त्यांची पिळवणूक वैगेरे यावर आधारित असली तरी नकळत यामध्ये एक गोष्ट जाणवते; की स्ञीने पैसा कमवून बाहेरच्या गोष्टी सांभाळल्या किंवा घरी राहून घरातील गोष्टी सांभाळल्यास तिला आदर आणि प्रेम मिळेलच अस नाही. तर तिला आदर आणि प्रेम तिला तेव्हाच मिळत जेव्हा ती आत्मविश्वासाने स्वतला सांभाळते. तिच्या स्वतमध्ये जेव्हा दुसर्यांसाठी प्रेम आणि आदर असतो; तेव्हाच तिलाही तो मिळतो. थोडक्यात तिच्यातील गृहलक्ष्मी तत्व एकदम भारी, प्रचंड ओतून भरलेल असायला हव…..!!!
…….चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये….. !!!!
©माधुरी दिपक पाटील
फोटो साभार गुगल