“डोपामाइन” हा शब्द पहिल्यांदाच ऐकला आणि मनात ऊत्सुकता निर्माण झाली. काय बर असेल हे डोपामिन किंवा डोपामाईन (dopamine) काहिही म्हणू शकता?? नाही म्हणायला अंदाजे टॅबलेटच नाव वाटल पण अभ्यासाअंती समजल की ‘डोपामिन’ म्हणजे तेच जे आपण रोज अनुभवतो.
कस बरं?? तर आपणाला अलीकडे जडलेली मोबाईल, खरेदी, फास्टफूड, आॅनलाईन गेम्स, युट्यूब यांसारखी व्यसने. माणूस या प्रलोभनांना बळी पडला आहे; हे नव्याने सांगायला नको. माणसाला या सर्व प्रलोभनांतून सुखाची प्रचंड अनुभूती येते आणि त्या गोष्टी वारंवार करण्याची दाट ईच्छा मनात निर्माण होते; तेव्हाच ‘डोपामिन’ नावाचे द्रव्य मेंदूत स्रवते.
‘डोपामिन’ हे एक हार्मोन आहे; जे आपल्या मेंदूत स्रवते. ‘डोपामिन’ हे हार्मोन जेव्हा माणसाच शरीर बनलं तेव्हापासूनच आहे. योग्य माञेतील ‘डोपामीन’ शरीरास अंत्यत गरजेचे आहे. जे शरीराच्या इतर क्रियांसाठी देखील आवश्यक असतं. ते एक प्रोत्साहन देणारं, मनाला खूश ठेवणारं संप्रेरक आहे. डोपामिनची कमतरता असेल तर नैराश्य येऊ शकतं.
एकंदरित आपणाला समजल की डोपामिन काय आहे; त्याची शरीराला गरज असते पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच!
आजकाल खूश होण्याची, आनंदाची परिमाणे आणि कारणे खूप बदलली आहेत. आपण करतोय ते चूकीच आहे, वेळ वाया घालवणारं आहे; हे माहित असूनही केवळ आनंद मिळविण्यासाठी डोपामिनची अतिउच्च पातळी गाठली जाते आणि पुन्हा-पुन्हा त्याच गोष्टी करण्यास भाग पाडते. डोपामिन द्रव्य खूप प्रमाणात स्रवल जावून, माणूस त्यात गुरफटत जातो आणि पुन्हा त्याच गोष्टी करतो.
ऊदाहरण द्यायच झाल तर ‘वेबसिरीज.’ आजच्या घडीला मनोरंजनाचा नवीन प्रकार असलेल्या वेबसिरीज बघताना काहीस असचं होत. त्या सिरीज प्रत्येक भाग पाहताना पुढे काय होईल याची मनाला ऊत्सुकता लागून राहते ( ते भागच तसे बनवलेले असतात; तो त्यांच्या बिझनेसचा भाग समजूयात) की पुढे काय होईल, याची मनाला एवढी चटक लागून राहते नि पुढचा भाग बघितल्याशिवाय चैनच पडत नाही; त्यामुळे शरिरातील ‘डोपामिन’ची पातळी खूप वाढते, जे की शरिराला हानिकारक आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी धोकादायक आहे.
आता तुम्ही म्हणाल ही वेबसिरीज पाहत असेल, म्हणूनच हिला एवढं माहित आहे….तर नाही. नवर्याच्या खिशातले त्याच्या कष्टाचे पैसे वाया घालवून NETFLIX, AMAZON PRIME वैगेरे चे पॅकेज घ्यायला मला अजिबात आवडत नाही; आवडणारही नाही. परंतु सोशल मिडीया, टी.व्ही, न्यूजपेपर यांतून पाहिलेल्या, वाचलेल्या गोष्टींतून वेबसिरीज नक्की काय आणि कशाप्रकारच्या असतात याचा अंदाज आला आहे. बहुतकरून ‘वेबसिरीज’ पाहूच नयेत अस माझ वैयक्तिक मत पण शेवटी ज्याचा-त्याचा मनाचा प्रश्न आहे (वेबसिरीज वरती पुन्हा कधीतरी लिहीनच). असो…
अगदी एका क्लिक वर गोष्टी ऑर्डर करण्याची असलेली मुभा, मग ते खाण्याचे पदार्थ असोत किंवा इतर वस्तु, तसेच एका क्लिक किंवा स्वाइप वर उपलब्ध अनेक नवीन कंटेंट यामुळे सर्व सोशल नेटवर्किंग साईट तसेच सर्व ऑनलाईन शॉपिंग साईट म्हणजे कंटेंटचा अथांग डोह झालेल्या आहेत. या प्रत्येक साईट वर आपल्याला डोपामाइन किक मिळण्याची सोय केलेली आहे.
त्यामुळे नोटिफिकेशन हे नेहमी उठून दिसणाऱ्या लाल कलरने दाखवले जातात, त्यामुळे लाईक करणे अगदी एका क्लिक एवढे सोपे असते. या सर्व साईट किंवा ऍप वर बरेच फंक्शन हे स्वाईप किंवा फिंगर टॅप या अगदी सोप्या हालचालीवर ठेवलेले असते.
यावर नवीन/आवडीचे दिसेल म्हणून अगदी तासनतास वेळ स्वाईप करण्यात घालवला जातो. समजा काहीतरी पोस्ट करून आपण बराच वेळ व्हाटसऍप किंवा फेसबुक लावले नाही. आपल्याला पोस्ट बाबत आठवण झाली कि ती पोस्ट कोणी कोणी पहिली असेल किंवा लाईक केली असेल हे तपासण्यासाठी नोटिफिकेशन वर क्लिक करण्याची अगदी आधीची फिलिंग हि डोपामाइन मुळे तयार होते.
पुढे काहीतरी आनंददायी किंवा फायदेशीर आहे हि अपेक्षा लावणारी हि फिलिंग असते. तसेच आपण कोणाचातरी रिप्लाय ची वाट पाहत असतो आणि नोटिफिकेशन येते तेव्हा त्यावर जाऊन रिप्लाय काय आहे हे पाहण्याच्या आधीची फिलिंग किंवा एखादा क्लिक करून नेमकी बातमी काय आहे हे वाचण्या आधीची फिलिंग हि डोपामाइन मुळे आलेली आनंदी फिलिंग होय.
तर आपल्या सारख्या माणसाच्या या अतिऊच्च आनंद मिळविण्याच्या स्थितीला (state of excitment) मोठमोठ्या कंपन्यानी चाणाक्षपणे ओळखल आणि आपला मेंदू त्यांच्या ताब्यात राहिलं याची अभ्यासपूर्ण आखणी केली. अशाप्रकारची गॅजेट्स, जंक फुड्स तयार केली की आपल्याही नकळत आपण त्यांच्या अधीन झालो. माणसाला तत्काळ समाधान देत त्याची कमालीची सवय लावली. माणसाच्या मेंदूला ऊत्तेजित करून पूर्णपणे त्याचा कंट्रोल स्वतच्या हातात घेतला.
वेबसिरीज, फेसबुक, इंस्टाग्रामच्या नादी लागल्यान आजच्या तरूणांची झोप विकत घेऊन अनेक समाजमाध्यमांनी आपल्या तिजोर्या भरल्या आहेत. दोष त्यांचा नाहीच मुळी; ते व्यावसायिक आहेत पण आपल्यालाच आत्मनिरीक्षण करायची गरज आहे. यासर्वांमूळे होत काय की, आपल्या डोपामिनची पातळी वाढते. राञ-राञ जागल्यान पित्त, सततची डोकेदुखी, कार्यक्षमता कमी होणे, कशातच मन न लागणे, पाठीला बाक येणे, शारिरीक-मानसिक थकवा येणे, कधी खूप एकट वाटणं तर कधी खूप ऊत्साही वाटणं अशा गोष्टी घडतात.
हे सगळ बंद करता येणार नाही का? अगदी लगेच घाईघाईने बंद होणार नाही वा तसा प्रयत्न करून निराशाच पदरी पडेल. त्यामुळे मनात सकारात्मकता ठेवून हळुहळू आपणाला आपली उत्तेजना देणारी कामे कमी करायला हवीत. समाजमाध्यमांवरील सहज वावर कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा.
आता हे जमेल का? तर हो नक्कीच. एखादवेळा लाईट नसेल तर आपण बसतोच की विना फॅन, मोबाईलची बॅटरी संपली असेल तर ठेवतोच की मोबाईल बाजूला. फरक इतकाच की, तेव्हा आपला नाईलाज असतो आणि आजच्या घडीला आपल्याला मुद्दामहून तो दाखवावा लागेल.
म्हणजे कामाच्यावेळी शक्यतो खाजगी मोबाईल पूर्णपणे बंद ठेवणं. मधल्या सुट्टीत सोशल मिडीयाची सफर करण्यास हरकत नाही; माञ तो वेळ कमी करण्याचा प्रयत्न इथे महत्त्वाचा ठरेलं त्याऐवजी आपण आपल्या सहकार्याशी गप्पा मारण्यात वा शतपावली करण्यात गुंतवू शकतो; जेणेकरून मेंदूचा ताण कमी होईल आणि थोडा व्यायामही होवून जाईल….!
सुट्टीच्या दिवशी थोडावेळ का होईना शांत बसणं, घरातल्या लोकांशी गप्पा मारणं वा कुठेतरी भटकायला जाऊ शकतोय. मान्य आहे दररोज एकच काम केल्याने कंटाळा येतो मग ते जाॅब असो वा गृहिणींची घरातील कामे असो; म्हणून मग करत असलेल्या कामात थोड कौशल्य निर्माण करता येईल वा त्याला लागणारा वेळ कमी करता येईल आणि राहिलेला वेळ स्वतच्या मनन-चिंतनासाठी वापरता येईल. यामुळे मन आणि बुध्दी शांत राहून आपली “डोपामिन” पातळी संतुलित राहिल.
आयुष्य एकदाच मिळत….माझ्या मते ते सदृढ, आनंदी, निरोगी जगायच असेल तर आपली ‘डोपामिन’ पातळी संतुलित ठेवायला हवी; माणूस म्हणून सुखी जगायच असेल तर आपण निरोगी मनाचे असणे खूप महत्त्वाचे आहे….!!
लेख शेअर करावयाचा असल्यास नावासहित शेअर करावा….अन्यथा काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
असेच लेख/कथा/लघुकथा वाचायच्या असल्यास माझ्या ‘रंग आयुष्याचे’ या फेसबुक पेजवर जावून वाचू शकता.
फेसबुक पेजलींक:http://www.facebook.com/hernewinning/
पेजला नक्की लाईक करा…खुप धन्यवाद..!!!
©माधुरी दिपक पाटील
फोटो_साभार:- Pixabay