भाग १:-https://madhudeep.com/?p=526
भाग२:-https://madhudeep.com/?p=533
भाग३:-https://madhudeep.com/?p=539
भाग ४ पुढे वाचा:-
आलोकला वाटल नव्हतं कधीही आपल्या शब्दाबाहेर न जाणार्या अनन्याने आज घर सोडले होते…तेही आपणाला ऊलट ऊत्तरे देऊन….त्याच्या पुरूषार्थाला हे सहन होत नव्हतं…त्यामूळे रागाच्या भरात तो अनन्याच्या माहेरी शरदरावांना फोन करतो…..आणि शरदरावांशी खुप रागात अनन्याविषयी नको नको ते बडबडू लागतो.
शरदराव चाचपडत बोलतात…..कारण आपली मूलीची बाजू. त्यात समोरून जावई मूलीविषयी तक्रार करत होता.
ते दबक्या आवाजात आलोकला शांत करण्याच्या हेतूने “अहो अलोकराव जरा शांत व्हा….मला कळेल का काय झाल आहे ते…..??”
शरदराव त्यांच वाक्य पूर्ण करतायेत नाही तोवर आलोक पुन्हा भडकून “तुमच्या मूलीलाच विचारा ना….स्वत गेलेय आणि बरोबर माझ्या मूलीलाही घेऊन गेलेय…..तिला विचारा काय ते….मला ऊलट ऊत्तरे देतेय?”
शरदरावांच्या मनात शंकेची पाल चुकचूकते….एव्हाना आलोकला काय म्हणायच आहे ते त्यांच्या लक्षात आल होत…..ते वेळ न दवडता आलोकला विचारतात “अनन्या घराबाहेर पडून कितीवेळ झाला आहे…? कारण ती घरी नाही अाली…”
आलोक “तुम्ही माझी चेष्टा करत आहात का? अनन्या तुमच्या इथेच आली आहे….ती इथून निघून दोन तास होत आलेत……खर सांगा मला….ती आहे ना तिथे?”
शरदराव मनातून थोडे घाबरतात “नाही अनन्या नाही आहे इथे…..” मागून शोभनाताईंनी सगळ काही ऐकल होत. त्या मनातून घाबरतात….कारण सासर ते माहेर हे अंतर फारतर एकतास होत….पोरीने रागाच्या भरात जीवाच काही बर-वाईट तर केल नसाव? त्या शरदरावांजवळ येऊन बोलतात….फोन चालू असल्याने आलोकलाही ते ऐकू जातं……अलोकची थोडीफार राहिलेली सगळी नशा शोभाताईंच्या एका वाक्याने ऊतरते….खरच अनन्याने अस काही टोकाच????नाही अनन्या अस नाही करणार….माझी अन्वीही आहे तिच्यासोबत.
आलोकला धक्का बसला होता. एकतर अनन्या रागात घराबाहेर पडली होती…..आणि तिच्या बाबांकडेही गेली नव्हती….मग अन्वीसोबत अनन्या कुठे असेल? काही बरवाईट तर घडल असू नये….बाहेरची दुनिया किती खराब आहे….ती सावज मिळायच्याच तयारीत बसलेली असते.
आलोक कापर्या स्वरात….स्वतच्या कपाळावरचा घाम पुसत “बाबा……अनन्या?……माझी अन्वी……?”
आलोकच्या आवाजातील अरेरावीची जागा आता गर्भगळीत स्वराने घेतलेली शरदरावांना जाणवली……ते त्याला धीर देत “काळजी करू नका आलोकराव….काही होणार नाही अनन्या आणि अन्वीलाही. तुम्ही काळजी करू नकात…अनन्या फोन घेऊन गेलेय की घरातच आहे पहा. तिला फोन करा. तोपर्यंत मी आणि शोभना इथून तुमच्याकडे यायला निघतो. मिही अनन्याचा फोन लागतोय का पाहतो.”
शरदरावांच्या बोलण्याने आलोकला बरं वाटतं. तो फक्त “हो” म्हणून शरदरावांचा फोन ठेवतो आणि अनन्याचा फोन डायल करतो. फोन तिथेच वाजलेला ऐकू येतो. तो अनन्या नेहमी ज्या मैञीणींकडे जायची त्यांना काॅल करून विचारतो. अनन्या तिथेही नव्हती. आता आलोकला काहीच सुचेनास झाल होत. डोळ्यांसमोर अनन्या आणि अन्वीचे निरागस चेहरे ऊभा राहून त्याला त्याच्या अहंकाराची आठवण करून देत होते.
आलोक घरातील देवाला नमस्कार करतो. माणसापुढील शक्य रस्ते बंद झाले की आपोआपच त्याचे पाय देवाकडे वळतात आणि त्याच्यासमोर हात पसरले जातात. अनन्या आणि अन्वी कुठे असतील तिथे सुरक्षित असूदेत अशी प्रार्थना करून आलोक कारची चावी घेतो आणि अनन्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो.
आलोक जवजवळ सर्व गर्दीच्या ठिकाणांवर अनन्याला शोधत फिरत राहतो. न राहवून जवळच असणार्या एका पोलीस चौकीत जावून अन्वीबरोबरचा अनन्याचा फोटो दाखवतो आणि शोधाशोध करण्यासाठी पोलिसांची मदत घेतो.
दुपार केव्हाच ऊलटून गेली होती. एव्हाना शरदराव आणि शोभनाताई आलोक आणि अनन्याच्या घरी पोहचले होते. ते तस आलोकला कळवतात. आलोक फ्लॅटची चावी शेजारी ठेवून आला होता. तस तो शरदरावांना सांगतो. शरदराव आणि शोभनाताई खचलेल्या अवस्थेत मनोमन देवाचा धावा करत डोळ्यांत प्राण आणून अनन्याची वाट पाहत बसतात. त्यांना खाञी होती आलोक अनन्याला शोधून आणेल. शरदरावांना एवढा विश्वास होता जावयावर.
आलोक पोलीसांच्या मदतीने अनन्याचा शोध घेऊ लागला. साधारणत:चारच्या सुमारास शहराबाहेर असणार्या एका बसस्टाॅपवर अनन्या ऊभी असलेली दिसली. आलोकच्या जीवात जीव आला. त्याने कारची स्पीड वाढवली व अनन्याला कार दिसणार नाही अशी बाजूला लावून सावकाश तिच्यामागे येऊन थांबला. “अनन्या” म्हणुन तिला आवाज दिला.
आलोकच्या आवाजाने अनन्या दचकते. आलोक तिला शोधायला येईल अस तिला अजिबात वाटल नव्हत. त्याच्या पाठोपाठ पोलीसही तिथे येऊन थांबतात. आलोकबरोबर पोलीसांना पाहून अनन्या जास्तच बुचकळ्यात पडते.
अनन्याच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पाहून आलोक “अनन्या…..चल घरी चल. आपण जे काही आहे ते घरी जावून बोलूयात. बघ अन्वीचा चेहरा किती ऊतरला आहे. तु तूझ्याबरोबर अन्वीचेही हाल करत आहेस.”
अनन्याच्या कडेवर असलेली अन्वी रस्त्यावरून जाणार्या वाहनांकडे टकमक पाहत होती. आलोकला पाहून तीच्या चेहर्यावर हसू आल होत. तिचा लाडका डॅडा होता ना तो. आलोक हात पुढे करून अनन्याच्या कडेवरून अन्विला घेतो. अनन्याचा राग जरा शांत झाला होता पण मन माञ आलोकशी बोलायला तयार नव्हत. ती आलोकला “मी तूझ्या घरी येणार नाही. तुझ घर आहे ना ते. रहा तु एकटाच…..खूप गर्व आहे ना तुला तू कमावतो त्याचा.”
“नाही अनन्या…..रागाच्या भरात बोललो मी. इथूनपुढे नाही बोलणार….प्राॅमिस….!”
“आत्तापर्यंत कितीवेळा तु म्हटलास शिव्या देणार नाही, घाणेरडं बोलणार नाही….पण त्याच गोष्टी पुन्हा-पुन्हा करतोस तू……आणि हे काय नवीन पोलीस वैगेरे कशाला बोलवलेत?”
“मी खूप घाबरलो होतो…..त्यात अन्वीही तुझ्याबरोबर होती. तूझ्या माहेरी काॅल केला असता, समजल तु तिथेही नाहीस. मैञिणींना काॅल केला तिथेही नाहीस. मग तूला शोधण्यासाठी मला दुसरा पर्यायच ऊरला नाही. मला वाटल तु जीवाच काही बर-वाईट ??”
अनन्या त्याच्याकडे द्वेषाने पाहत “अहं…..स्वतच्या जीवाच काहीतरी बर-वाईट करायचे विचार अगोदर यायचे माझ्या डोक्यात पण आता मी स्वतला खूप कणखर बनवल आहे.
चुक करणारे, ञास देणारे मोकाट सुटतील आणि माझ्यासारख्यांनी अन्याय सहन करून आत्महत्या का म्हणून करायची? पण सोड हे मी तुला का सांगतेय?”
त्या दोघांच बोलण ऐकून वयस्कर पोलीस हवालदाराच्या नक्की भांडणाच मुळ काय आहे आणि चूक कोणाची असावी हे लक्षात येऊन तो आलोककडे पाहून त्याच्या बाॅसला “साहेब…..चला निघूयात आपण….मिटवू दे त्यांच त्यांना. ही आजकालची पोर लग्न करत्यात. नव्याचे नऊ दिवस एकमेकांशी प्रेमाने वागतात आणि नंतर स्वतचे रंग दाखवतात व पोलीसात तक्रार करून आपल्या डोक्याला ताप देतात.”
यावर मुख्य पोलिस “खर आहे…..मिस्टर आलोक मॅडमना घरी घेऊन जा आणि पुन्हा त्यांना ञास देण्याची चूक करू नकात. तुमच्या दोघांच्या भांडणात त्या लहान बाळाचे हाल करू नकात….समजल? आम्ही निघतो.”
पोलिस निघून जातात. आलोक खाली मान घालून अनन्याला घरी जावूयात म्हणून विनवणी करत असतो पण अनन्या काही मानायला तयार नव्हती. तोच आलोकला शरदरावांचा फोन येतो. आलोक फोन ऊचलून अनन्या सापडली आहे. तुम्ही काळजी करू नका अस सांगुन फोन ठेवतो.
अनन्याला समजत नाही की आलोक व्यतिरीक्त तिने घर सोडलेल कोणालाही माहीत नाही मग आलोक माझ्याबद्दल कोणाला सांगत होता? तिने आलोकला तस विचारल असता; आलोक तिला तुझ्या काळजीने घरी तूझे आई आणि बाबा आल्यात अस सांगतो.
अनन्या आलोकवर जास्तच चिडते. तु माझ्या आईबाबांना इथे बोलावून त्यांना का ञास दिलास अस आलोकला खडसावून विचारते. आलोक नक्की काय आणि कस त्यांना कळाल हे अनन्याला सांगतो आणि माझ्यासाठी नाही पण तुझ्या आई-बाबांसाठी घरी चल अशी विनंती अनन्याला करतो.
खरतर अनन्याच्या मनात आलोक आणि तिचे बाबा या दोघांबद्दल राग होता पण आई? तिचा विचार कोणीही कधीही केला नाही. तिच्या वाट्याला कायमच काळजी, चिंता आली आहे…..तिच्यासाठी मला जायला हवं. असा मनाशी विचार करून आलोक बरोबर घरी जायला तयार होते….माञ अनन्या “मी आत्ता फक्त आईसाठी घरी येत आहे. पण तुला सोडण्याच माझ मत बदलेलच अस नाही. आणि हो बाबांनाकडूनही काही प्रश्नांची ऊत्तरे हवी आहेत ” अस आलोकला स्पष्ट सांगते आणि त्याच्याबरोबर घरी जाते.
शोभनाताई एकटक शून्यात नजर लावून अनन्या येण्याची वाट पाहत होत्या. तर शरदारावांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. लहानपणापासून आपल्या कोणत्याही निर्णयाला दुजोरा देणारी अनन्या, आज तिने घर सोडून जाण्याचा एवढा मोठा निर्णय आपणाला न सांगता घ्यावा? आलोकजवळ खरच ती खूष नाही का? हे सगळ माझ्यामुळेच तर नाही ना झाल? कारण आलोकशी भांडल्यावर तिने माहेरी आपल्याकडे यायला हव होत? समाजाच्या चालीरीती सांभाळत इतक परक केल का आपण आपल्या मुलीला?
आलोकची गाडी दारात आल्याचा आवाज येताच शरदराव आणि शोभनाताई स्वतला सावरत ऊभा राहतात. अनन्या अन्वीला घेऊन घरात येते. गाडी पार्क करून मागून आलोक येतो. शोभनाताई लगबगीने अनन्यासाठी पाणी आणतात…..मुलीला आणि नातीला सुखरूप पाहून त्यांच्या डोळ्यांतून अलगद अश्रू बाहेर पडतात.
शरदराव अनन्याच्या नजरेला नजर न लावता “अनन्या…..अस तडकाफडकी निर्णय घ्यायचा नसतो. निदान आम्हाला तरी कळवायच होतस.”
शोभनाताई किचनमध्ये जावून अन्वीसाठी खायला घेऊन येतात. अन्वीच्या हातात खेळणं देऊन तिला स्वतच्या जवळ घेतात आणि तिला भरवायला सुरूवात करतात.
शरदरावांच्या वाक्यावर थोड शांत बसून अनन्या ऊत्तर देते “बाबा….तडकाफडकी का होईना पण मी आज निर्णय घेतला….आणि माफ करा मला पण तुम्हाला कळवून काय करणार होतात तुम्ही. माहेरी आश्रय दिला असता का? ऊलट म्हटला असतात पोरी आता तेच तुझ घर आहे….लग्न झालेल्या मुलीने अस माहेरी येणं बर नव्हे. आपल्या घराण्याला ते शोभत नाही. आपल्या संस्कारात ते बसत नाही असच ना?? ”
शरदरावांना पुढे काहीच बोलवत नाही. ते खूर्चीचा आधार घेऊन खाली बसतात. आलोक तर काय बोलणार होता. त्याला माहित होत; चूक त्याची होती.
आलोक आणि स्वतच्या बाबांना अस शांत बसलेल पाहून अनन्या “काय झाल बाबा…तुम्ही शांत का? विचारा ना तुमच्या जावयाला कसा वागतो तो माझ्याशी?”
शरदराव आलोककडे एक कटाक्ष टाकतात. आलोकने मान खाली घातली होती.
न राहवून अनन्या “अगदी तुमच्यासारखा…..आजपर्यंत ज्याप्रमाणे तुम्ही आईशी वागलात त्याचप्रमाणे तुमचा जावई माझ्याशी वागतोय….!”
आपल्या बाबांना अनन्या अस बोलताना पाहून शोभनाताई अनन्याला शांत बसायला सांगतात. पण अनन्या “नाही आई….नाही….खूप ञास दिला बाबांनी तुला. मला समजत होत तेव्हा. इतकीही लहान नव्हते मी. फरक इतकाच की आज तीच वेळ माझ्यावर आल्याने जास्त जाणवत आहे की तुझ्या मनावर किती खोलवर परिणाम झाला असेल वारंवार बाबांनी केलेल्या तुझ्या अपमानाचा…..!”
शोभनाताईंनी आजवर कधीही स्वतच्या पतीला उलट ऊत्तर दिल नव्हत….त्यामुळे अनन्या आपल्या पतीला अस बोललेलं त्यांना न पाहवून “अनन्या…..झाल गेल गंगेला मिळाल. मी कधी राग मानला नाही माझ्या झालेल्या अपमानाचा मग तु कशाला इतका विचार करतेस?”
“तेच ग तेच चूकल आई तुझ….तु तूझ्यावर होणार्या अन्यायाचा कधीच प्रतिकार केला नाही. पण या सगळ्यांचा तेव्हा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला होता.
त्यामूळे आपोआपच होणार्या लाईफपार्टनर विषयी माझी एकच ईच्छा होती की होणारा नवरा कमी शिकलेला असूदे, कमी श्रीमंत असूदे पण बायकोची किंमत करणारा असावा, तिला समजून घेणारा असावा, तिला चार-चौघांत मान देणारा असावा बस्स…!
सुरूवातीला वाटल आलोक असाच आहे पण माझी अपेक्षा फोल ठरली आणि नियतीचे भोग पदरी पडले. पुनरावृत्ती झाली गं….! आणि बघ आई तू भोगलेले सगळे ञास मला भोगावे लागत आहेत.”
शरदरावांच्या पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. डोळ्यांचा चष्मा काढून हळूच त्यांनी त्या रूमालाने टिपल्या.
त्यांचा भूतकाळ त्यांच्यासमोर ऊभा राहिला. त्यांच मन त्यांना खावू लागलं. आपण शोभनाची केलेली प्रतारणा, तिला दिलेल्या शिव्या, तिने कायम घरातल्या बाकी लोकांची सेवा करावी हा आपला असलेला तिच्यामागचा ससेमेरा……कधीही आपुलकीने तिची न केलेली विचारपूस, एकदा तिने ऊलट ऊत्तर देण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी तिला घर सोडून जा म्हणून आपण दिलेली धमकी आणि त्यासाठी निदान दोन-तीन वर्षे तिच्याशी धरलेला अबोला “….अनन्या…! माफ कर बेटा मला. शोभनाशी खरच खूप वाईट वागलो मी.”
“बाबा….आईची माफी मागा. माझी माफी मागून तसाही काही फायदा नाही…..कारण त्यामूळे माझ आयूष्य बदलणार नाही. ते आता तुमच्या जावयाच्या हातात आहे. आणि आता तुमची जागा त्याने घेतली आहे. तुम्ही आईबाबतीत केलेल्या प्रत्येक गोष्टीची परतफेड आता तुमच्या मुलीकरवी होत आहे. सगळे भोग आता माझ्याकरवी फेडले जात आहेत…..बाबा….पुनरावृत्ती तर होणारच…..नियतिचा नियमच आहे. तुम्ही जे देता ते आज ना ऊद्या फिरून तुमच्यापर्यंत येतच. ”
शरदरावांचा जो काही सामाजिक ताठा होता; तो गळून पडला होता. आपल्या लाडक्या मूलीच्या डोळ्यांतील पाण्याने आणि ह्वद्याला भेदणार्या तिच्या प्रत्येक शब्दाने त्यांच मन घायाळ झाल होत. तोंडातून शब्द फुटत नव्हता त्यांच्या….ते खूर्चीवरून ऊठतात आणि अनन्याजवळ जावून तिच्या डोक्यावर हात ठेवून “मी तुझ्या आईचा आणि तूझाही अपराधी आहे. माझ्या पापाची फळे आज माझ्याच लाडक्या मुलीला सहन करावी लागत आहेत. शोभनाही कोणाची तरी मुलगीच होती. आज माझ्या मूलीची दिनवाणी अवस्था पाहून मग मला माझ्या बायकोची अवस्था समजत आहे. अस का व्हाव? तेव्हाच मला हे सगळ ऊमजल असत तर…….शोभनाच्या चेहर्यावर या चिंतेच्या सुरकूत्या काही अंक्षी तरी कमी पडल्या असत्या आणि आज माझी मुलगी माझ्या कृत्याची परतफेड न करता खूष असती….!!
आपल्या पित्याला अस शरणागती गेलेल पाहून अनन्याला पाहवत नव्हतं. आपल्या बाबांची मान ताठ राहवी हाच प्रयत्न तिने कायम केला होता…..पण आपल्या अन्वीसाठी तिला घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला होता…..तिला तिच्या मुलीबाबत नको होती हिच पुनरावृत्ती…!
आलोक सगळ काही ऐकून पूर्णपणे शांत झाला होता. त्याच्यासमोर त्याला शोभनाताईंच्या रूपात अनन्या आणि अनन्याच्या रूपात अन्वी दिसू लागली होती….. आपण अनन्याच्याबाबतीत जे वागत आहोत तेच ऊद्या अन्वीच्या बाबतीत घडू नये या विचाराने त्याच मन जागरूक झाल होत….. आपण स्वत अनन्याबरोबर किती चूकीच वागलो या विचाराने तो मनातून खजील झाला होता. आलोकच्या चेहर्यावरील पश्चात्ताप शरदरावांना खूप काही सांगून गेला.
एव्हाना अन्वीच खावून झाल होत. ती मस्त खेळू लागली होती. एक-एक पाऊल टाकत, आधाराला धरून ती हाॅलमध्ये बसलेल्या प्रत्येकाकडे जात होती. एरवी दिवसभर अनन्या आणि तिच घरात असायच्या. आलोक दिवसभर आॅफिसमध्ये. आज तिला आजी-आजोबा, मम्मा-डॅडा इतके सगळेजण दिसत होते. अन्वी जोरजोरात टाळ्या वाजवून चेकळत होती. कदाचित काहीतरी खूप दिवसांपासून खूपत असलेल दुखण बर होऊन आयुष्याला नवीन दिशा मिळणार होती; याची जाणीव तिलाही झाली असावी…..!
शरदराव आलोकजवळ जावून त्याच्या खांद्यावर हात ठेवतात “आलोकराव तुमच्या अन्वीच्या चेहर्यावर कायम आनंद पाहयचा असेल तर तुम्हाला अगोदर अनन्याला खूष ठेवायला हव. जावईबापू तुम्ही पाहीलच माझ्या या चूकीची शिक्षा तुमच्याकरवी अनन्याला मिळाली पण ऊद्या हेच तुमच्या जावयाकरवी अन्वीला सहन कराव लागू नये……तुम्हाला आणखी काहीच सांगायची गरज नाही. सगळकाही तुमच्यासमोरच आहे.”
आलोक अनन्याजवळ जावून “अनन्या मला माफ कर. माझ्या पुरूषी अहंकारापायी मी तुला ञास दिला. सतत ‘मी’ चा पाढा चालू ठेवला. त्या ‘मी’ मुळे तुझ्याविषयीच माझ प्रेम अंधुक झाल. आज घडलेल्या सगळया प्रकारामूळे तू मला काळ्याकुट्ट अंधारात जाण्यापासून वाचवलस….इथूनपुढे मी कधीही तुझ्यावर वा अन्वीवर अवाजवी हक्क गाजवणार नाही.”
अनन्या “आलोक….प्रश्न हक्काचा नव्हता की अधिकाराचा पण एक माणुस म्हणुन जगताना प्रत्येकाला स्वतच आयुष्य स्वतच्या मनाप्रमाणे जगता यायला हव.”
आलोक अन्वीला अनन्याकडे देतो आणि शरदरावांच्या पाया पडून त्यांची माफी मागतो. शरदराव आलोकला “आलोकराव तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्हाला तुमची चूक लवकर समजली….पण मी (शोभनाताईंकडे पाहून) आयुष्यभर ती चुक करत राहिलो….शोभना मला माफ कर. आयुष्यात जे काही दिवस ऊरले आहेत, त्यात मी तुला खूष ठेवण्याचा प्रयत्न करेन.”
शोभनाताई पदराने डोळ्यातील पाणी टिपतात. त्यांना अनन्याच खूप कौतुक वाटत होत. नेहमी शांत असणार्या आपल्या मुलीने आज जणू देवीचा अवतार धारण करून आईच्या व स्वतच्या आयुष्यातील ञास….आणि भविष्यात मुलीच्या बाबतीत घडू पाहणारी त्याची पुनरावृत्ती संपवली होती…..!!
-*********———–समाप्त——–******——-*******——
प्रिय वाचकहो, कथेचे चारही पार्ट वाचून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. बर्याच कुटूंबात, समाजात अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. कधी मुलीच्याबाबतीत, तर कधी सुनेच्याबाबतीत, कधी बायको तर कधी आईबाबतीत…. कधी नवर्याबाबत तर कधी वडीलांच्या बाबतीत…..पण दुसर्यांच्याबाबतीत आपल्याकडून घडणार्या या चुका काही काळ गेल्यानंतर स्वतबाबतीत घडून या ना त्यामार्गाने त्याची परतफेड होते.
म्हणूनच आपल्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक नात्याची किंमत करायला हवी, नात्याचा आदर करायला हवा आणि हक्क न गाजवता ते नातं प्रेमाने निभवायला हव….बरोबर ना?
©माधुरी सोनवलकर-पाटील
फोटो_साभार_गुगल
अशाच छान कथा/लेख वाचण्यासाठी माझ्या रंग आयुष्याचे-http://www.facebook.com/hernewinning/ या फेसबुक पेजला लाईक आणि फाॅलो करा….धन्यवाद!!
Comments 1